रात्री दारूची मैफल, दिवसा शेळ्या-मेंढ्यांचे कुरण; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह,
शेतकऱ्यांचा संतप्त सवाल – याच दिवसासाठी कमी भावात जमीन दिली होती का?
सिंदी (रेल्वे ): शहरातील नगरपरिषदेचे क्रीडांगण सध्या गंभीर चर्चेचा विषय ठरले असून, या मैदानाची सद्यस्थिती पाहता ते नेमके कोणत्या उद्देशासाठी तयार करण्यात आले, असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. वर्धा जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी लागू असतानाही, या स्टेडियमवर दररोज रात्री दारूच्या मैफली रंगत असून मैदानावर दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पसरलेला दिसत आहे. तर, दिवसा याच मैदानाचा वापर शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी केला जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी, शारीरिक विकासासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, या उदात्त हेतूने हे स्टेडियम उभारण्यात आले होते. मात्र, सध्याची दुरवस्था पाहता मैदानाचा मूळ उद्देशच हरवला असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या त्यागावर पाणी, संतापाची लाट
विशेष म्हणजे, या क्रीडांगणासाठी स्थानिक शेतकरी स्व. गणपतराव कलोडे यांनी आपली मौल्यवान शेतजमीन अत्यंत कमी भावात प्रशासनाला दिली होती. विद्यार्थ्यांना आणि शहरातील नागरिकांना एक सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध व्हावे, या अपेक्षेने शेतकऱ्यांने आपल्या जमिनीचा त्याग केला. मात्र, आज मैदानाची झालेली ही दयनीय अवस्था पाहून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसाना मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही विद्यार्थ्यांच्या आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमी भावात जमीन दिली होती. मैदानावर रात्री दारूच्या मैफली रंगाव्यात आणि दिवसा शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी त्याचा वापर व्हावा, यासाठीच जमीन दिली होती का?” असा संतप्त सवाल शेतकऱ्याचे वारस व आता विचारत आहेत.
दारूबंदीचा फज्जा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातील या मैदानावर खुलेआम दारू पिली जात आहे आणि फोडलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच साचला आहे. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर नागरिकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. अवैध दारू विक्री आणि उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मैदानावर पसरलेल्या या काचेच्या बाटल्यांमुळे खेळायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तातडीने कारवाईची मागणी
या सर्व प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवून तळीरामांवर कडक कारवाई करावी, तसेच नगरपरिषदेने मैदानाची नियमित स्वच्छता करून सुरक्षारक्षक नेमावा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिक व विद्यार्थी कडून होत आहे…
