काल्याचे कीर्तन, दहीहंडी आणि महाप्रसादाने कार्तिकी उत्सवाची सांगता
श्री क्षेत्र घोराड : विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे कार्तिकी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आज उत्सवाची सांगता काला, दहीहंडी आणि महाप्रसादाने होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरती आणि अखंड वीणावादनाला सुरुवात झाली होती. मंगळवार, दि. २४ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री १२ वाजता लाखो वातींचा त्रिपुर प्रज्वलित करण्यात आला. श्री संत केजाजी महाराज यांच्या काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे.
आज दुपारी १२ वाजता ह.भ.प. लक्ष्मण गुडवार यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर काला वितरण करण्यात येईल. दुपारी ४ वाजता श्री संत केजाजी महाराज यांची पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिराच्या परिकोटाला प्रदक्षिणा घालणार आहे. पालखी श्री संत नामदेव महाराज यांच्या समाधीस्थळी पोहोचल्यानंतर गंगागाय मंदिरावर दहीहंडी उत्सव पार पडणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मंदिरात महाप्रसादाचे वितरण होणार आहे. उद्या प्रक्षाळ पूजा, आरती व भजनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
शतकानुशतके चालत आलेली संत परंपरा, भक्तीचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह यामुळे श्री क्षेत्र घोराड आज भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
— शिवशाही न्यूज नेटवर्क

