भरधाव ट्रक वाहनांच्या रांगेत घुसला; २५ ते ३० वाहनांचा चक्काचुर, अनेक प्रवासी जखमी; महामार्गावर लांबच लांब रांगा
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, शुक्रवार (१३ नोव्हेंबर) रोजी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात भीषण साखळी अपघात घडला. एका भरधाव ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेला जोरदार धडक दिल्याने एकापाठोपाठ अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण दुर्घटनेत तब्बल २५ ते ३० वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
टँकर हटविण्याचे काम सुरू असतानाच काळाचा घाला!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर आधी एक टँकर उलटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. टँकर हटविण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक वाहने रांगेत उभी होती. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या लोखंडी रोल्स वाहून नेणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट वाहनांच्या रांगेत घुसला.
या धडकेनंतर एकापाठोपाठ एक वाहने एकमेकांवर आदळली. काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सुमारे २० ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
वेगावर नियंत्रण, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर आणि महामार्गावरील वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या भीषण अपघाताने पुन्हा एकदा करून दिली आहे.
