नागपुर : नागपुर येथील कॉटन मार्केट परिसरात दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टार्जन असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून लोखंडी पुलाजवळ फेकून देण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत टार्जन हा रात्री चार मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातून धर्मा नावाच्या व्यक्तीने टार्जनच्या डोक्यात लाकडी पट्टीने वार केला. त्यामुळे टार्जन बेशुद्ध झाला. तो मृत झाल्याचे समजून आरोपींनी त्याचा मृतदेह गोणीत भरला आणि लोखंडी पुलाजवळ फेकून दिला.
या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान हा आकस्मिक मृत्यू नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी मोहम्मद इस्लाम आणि शशिकांत जामठावार या दोघांना अटक करण्यात आली असून किशोर आणि धर्मा या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
