सेलू : –
बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसर, शिर्डी येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यानजीकच्या घोराड येथील युवा पत्रकार पंकज दामोधर तडस यांना त्यांच्या सामाजिक, पत्रकारिता व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख उपस्थितीत माजी भारतीय सैनिक संजय कुमार, पोलीस निरीक्षक पो. स्टे. कोपरगाव संदीप कोळी, नायब तहसीलदार कोपरगाव प्रफुल्लिता सातपुते, सैनिक फेडरेशन नाशिकचे कार्याध्यक्ष अरुण भांडरे ( RTD1 ), अभिनेत्री / मॉडेल निवेदिता पगार, उद्योगपती संजय वाबळे ( पुणे ) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा सन्मान करण्याचा उद्देश या पुरस्कार सोहळ्यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात सांस्कृतिक वातावरणासह मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.
पंकज तडस यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान आपल्या गावातील नागरिक, वाचक व सहकाऱ्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे घोराड परिसरासह वर्धा जिल्ह्याचा गौरव वाढला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

