सेलू तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
शहर प्रतिनिधी
सेलु
सेलु : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक रोशन राऊत यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पात्रे साहेब यांना निवेदन दिले. निवेदनात सेलु-हिंगणी रोड, वर्धा-नागपूर रोड ते कोटंबा मार्ग, चार मंडळ-धपकी मार्ग तसेच केळझर-दहेगाव मार्ग या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसात खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वार आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या सर्व रस्त्यांची तात्काळ पाहणी करून महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम पुर्ण करावे, अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, वेळेत काम पुर्ण न झाल्यास शिवसेना सेलु-वर्धा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रोशन राऊत यांनी दिला आहे.
