राजेश वरटकर
मुख्य संपादक
मान्सुनचे अंदमानात वेळेआधी आगमन; केरळमध्ये 26 मे तर महाराष्ट्रात 2 ते 5 जुनदरम्यान पावसाची शक्यता
यंदाचा नैऋत्य मान्सुन नियोजित वेळेपुर्वीच सक्रिय झाला असुन 16 मे 2026 रोजी अंदमान बेटांवर दाखल झाला आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही मान्सुनचा वेग चांगला असल्याने केरळमध्ये 26 मे रोजी तर महाराष्ट्रात 2 ते 5 जुनदरम्यान मान्सुन दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.गेल्या काही महिन्यांपासुन अल-निनोचा परिणाम मान्सुनवर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतीय महासागरातील सकारात्मक स्थितीमुळे मान्सुनने अल-निनोचे सावट झुगारून वेळेच्या तीन दिवस आधी अंदमान बेटांवर प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त होत असुन शेतकऱ्यांमध्ये दिलास्याचे वातावरण आहे.
सामान्यतः मान्सुन केरळमध्ये 1 जुनच्या आसपास पोहोचतो. मात्र यंदा तो 26 मे रोजीच केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही नियोजित वेळेपेक्षा तीन ते चार दिवस आधी, म्हणजे 2 ते 5 जुनदरम्यान मान्सून पोहोचु शकतो.
मागील वर्षी म्हणजे 2025 मध्ये मान्सून 13 मे रोजी अंदमानात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने विक्रमी वेगाने पुढे सरकत महाराष्ट्रात लवकर प्रवेश केला होता. गेल्या 16 वर्षांतील तो सर्वात वेगवान मान्सुन मानला गेला होता. यंदाही तशीच परिस्थिती दिसुन येत असून मान्सुनचा वेग आणि सक्रियता पाहता भरपुर पावसाची आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या पाच वर्षांतील अंदमान बेटांवरील मान्सुन आगमन
2021: 21 मे – थोडा उशीर
2022: 16 मे – वेळेआधी
2023: 19 मे – वेळेवर
2024: 19 मे – वेळेवर
2025: 13 मे – खुप लवकर
2026: 16 मे – वेळेआधी
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत
मान्सुनचे वेळेआधी आगमन आणि त्याचा सुसाट वेग पाहता यंदा खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत पाऊस मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

