श्री लक्ष्मीबाई देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; सोमवार, १९ ऑक्टोबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु (वर्धा) : नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असलेल्या लक्ष्मीबाई मंदिरात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवी नवरात्र महोत्सवानिमित्त रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन, परिसरातील भाविकांसाठी ही आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असलेल्या लक्ष्मीबाई मंदिरात पहाटे पासुन दर्शनासाठी गर्दी उसळत असुन परिसरातील महिला वर्ग आरती साठी हजेरी लावत आहे.या सप्ताहात श्रीमद् भागवत कथा प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. दररोज सकाळपासुन रात्रीपर्यंत मंदिर परिसरात भक्तिरसाचा जागर होणार असून, भाविकांना अध्यात्मिक चिंतनासोबतच भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत आहे.
*मयुर महाराज दरणे यांच्या अमृतवाणीतुन भागवत कथा!
या ज्ञानयज्ञ सप्ताहात भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. मयुर महाराज दरणे विश्व शांती धाम येळाकेळी(वर्धा) यांच्या अमृतवाणीतुन श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होत आहे. त्यांच्या रसाळ वाणीतुन भागवत कथेतील आध्यात्मिक विचार, भक्तिमार्गाचे महत्त्व आणि जीवनमुल्यांचा संदेश भाविकांना ऐकायला मिळत आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध संत-महंतांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा जपत गावातील भाविकांना एकत्र आणण्याचा आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सोमवारी भव्य महाप्रसाद!
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन, दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील नागरिक, महिला, पुरुष आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लक्ष्मीबाई देवस्थानाच्या वतीने अध्यक्ष प्रशांत सावरकर,नथ्थुजी नान्हे, गजानन कोल्हे, सुधाकर बांड बैल यांनी केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने टाकळी येथील श्री लक्ष्मीबाई देवस्थान परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळत आहे, ज्ञानयज्ञ सप्ताहामुळे गावातील धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले आहे.
स्थळ : श्री लक्ष्मीबाई मंदिर, टाकळी (झडशी), ता. सेलु, जि. वर्धा.
शिवशाही न्युज | वर्धा



