*प्रेमप्रकरणातुन वाद पेटल्याची प्राथमिक माहिती; मध्यरात्रीपर्यंत ठाण्यात गोंधळ
महिला ठाणेदार खाली पडल्याची चर्चा; अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी दाखल
शिवशाही न्युज नेटवर्क
कन्हान (कामठी)
नागरिकांमधील वाद मिटवुन कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) रात्री साडेसातच्या सुमारास कन्हान येथे घडली. प्रेमप्रकरणातुन हा वाद निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती असुन, या घटनेमुळे पोलीस वर्तुळासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी येथील मुलीकडील मंडळी आणि कन्हान येथील मुलाकडील मंडळी यांच्यातील वाद विकोपाला गेला. दोन्ही बाजूंच्या मंडळींमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना महिला ठाणेदार खाली पडल्याचे वृत्तही समोर आले आहे.
मध्यरात्रीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठाण्यात मुक्काम
घटनेनंतरही परिस्थितीची चर्चा आणि संबंधितांची उपस्थिती कायम होती. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजेपर्यंत दोन्ही गटांतील मंडळी पोलीस ठाण्यात असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असल्याचे समजते.
पोलीस ठाण्यातील हाणामारीने उपस्थित केले प्रश्न
सामान्य नागरिकांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट आमनेसामने आल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. वाद नेमका कशामुळे पेटला, हाणामारीत किती जण सहभागी होते, कोणाला दुखापत झाली का आणि या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कन्हानमधील या घटनेची नेमकी वस्तुस्थिती काय, संबंधितांवर कोणती कारवाई होणार आणि पोलीस प्रशासन याबाबत काय भुमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

