कालव्याचे पाणी शेतात नव्हे, थेट नाल्यात! पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर
गेट नादुरुस्त असल्याने पाण्याची मोठी नासाडी; संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पाणी बचतीचा प्रश्न ऐरणीवर!
राजेश वरटकर
शिवशाही न्युज
कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे ही पाटबंधारे विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, कालव्यावरील गेट नादुरुस्त असल्यामुळे पाणी कालव्यातून वाहण्याऐवजी नाल्याप्रमाणे वाहुन जात असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरवर्षी पाटबंधारे विभागाचे वतीने लाखो रुपये पाटच-या व पाणी वाहुन जात असलेल्या मायनर दुरुस्ती साठी खर्च करीत आहे मात्र बोरधरण ते सेलु तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा होत असलेल्या पाटचरी व मायनर वर झाडेझुडपे आणि गवत वाढलेले दिसत असुन, पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण नसल्याचे शेतकरी सांगतआहे. या कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे,एकीकडे भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती असताना, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी त्याची नासाडी होत असेल, तर ही बाब गंभीर आहे.
अधिकाऱ्यांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह!
कालव्यावरील गेटची नियमित तपासणी होते का? नादुरुस्त गेटची दुरुस्ती वेळेत का केली जात नाही? पाणी वाया जात असल्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नादुरुस्त गेटची दुरुस्ती करावी, पाण्याचा अपव्यय थांबवावा आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
पाणी हे शेतकऱ्यांचे जीवन आहे; त्याची नासाडी रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे!

