रात्रीच्या आरतीला महिलांची प्रचंड गर्दी; मंदिरांमध्ये घटस्थापना, परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला
राजेश वरटकर
मुख्य संपादक
घोराड : विदर्भातील प्रतिपंढरपुर म्हणुन ख्याती असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गावातील विविध देवी मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली असुन, दररोज सकाळी आणि सायंकाळी सात वाजता होणाऱ्या आरतीसाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीच्या जयघोषाने संपुर्ण घोराड नगरी भक्तिमय झाली असुन, पुढील दहा दिवस हा भक्तीचा गजर सुरू राहणार आहे.
श्री संत केजाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र संत नामदेव महाराज यांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या घोराड नगरीला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. गावात अनेक संतांची तसेच देवी-देवतांची मंदिरे असल्याने या तीर्थक्षेत्राला विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळखले जाते.
नवरात्रोत्सवानिमित्त श्री संत केजाजी महाराज मंदिरासमोरील भवानी माता मंदिर, मंदिर परिसरातील मातामाय मंदिर व लक्ष्मीमाता मंदिर, सेलु-घोराड मार्गावरील माता आई मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिरामागील श्री जगदंबा माता मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर, गंगागाय मंदिर, सेवालाल मंदिर तसेच केजाजी टाऊन येथील लक्ष्मी मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे.
सायंकाळच्या आरतीला महिलांची विशेष उपस्थिती
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दररोज सकाळी आणि सायंकाळी सात वाजता विविध मंदिरांमध्ये देवीची आरती केली जात आहे. सायंकाळच्या आरतीसाठी महिलांची विशेष गर्दी होत असून, भक्तिभावाने देवीची पूजा-अर्चना केली जात आहे. मंदिरांमध्ये सुरू असलेला देवीचा जयघोष, आरतीचा निनाद आणि भाविकांची लगबग यामुळे घोराड परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविकांकडून देवीची आराधना, पूजाअर्चा आणि दर्शन घेतले जात आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या नवरात्रोत्सवामुळे श्री क्षेत्र घोराड नगरी देवीमय झाली असून, आगामी दिवसांतही मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी राहण्याची अपेक्षा आहे.




