निसर्गरम्य वातावरणातील प्राचीन श्रद्धास्थान; नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, महाप्रसादाने होणार उत्सवाची सांगता
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज
सेलु तालुक्यातील बोरधरण परिसरातील निसर्गाच्या कुशीत वसलेले भोंडाई मातेचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. घनदाट जंगल, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरणात वसलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नवसाला पावणारी देवी अशी भोंडाई मातेची भाविकांमध्ये श्रद्धा असुन, देवीच्या दर्शनासाठी दुरवरून भाविक मंदिरात दाखल होत आहेत.
बोरधरण परिसरातील जंगलाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला निसर्गसौंदर्याची अनोखी किनार लाभली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे श्रद्धास्थान भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. देवीच्या दर्शनासोबतच येथील शांत आणि प्रसन्न वातावरण भाविकांना आध्यात्मिक अनुभुती देणारे ठरत आहे.
पहाटे ५वाजता आरती व जंगलात रंगतो भोंडाई मातेचा जागर!
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटेच्या सुमारास होणारी आरती व भोंडाई मातेचा जागर हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. पहाटेच्या शांत वातावरणात देवीच्या नामस्मरणाने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमुन जातो. दर्शनासाठी येणारे भाविक श्रद्धेने देवीच्या चरणी नतमस्तक होऊन नवस बोलतात.
नवरात्रोत्सवात वाघाच्या दर्शनाचीही चर्चा!
भोंडाई मातेच्या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवादरम्यान दरवर्षी वाघ दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जाते, यावर्षी सुध्दा घटस्थापनेच्या दिवशी पट्टेदार वाघ व मंगळवारी बिबट्या दिसला असल्याचे येथे दहा दिवस मुक्कामी असलेले सुधीर चौधरी यांनी सांगितले. यामुळे या मंदिराबद्दल परिसरात विशेष आकर्षण आणि कुतुहल आहे.
धार्मिक कार्यक्रम घट विसर्जन आणि महाप्रसादाने सांगता
नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, देवीची पुजा, आरती , भजन संध्या आणि जागराचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या सांगतेप्रसंगी सोमवारी १९ ला घटविसर्जन व १२वाजतापासुन भव्य महाप्रसादाचे आयोजन होणार असुन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सुधीर चौधरी,राजु कुंभरे, राजेश डेकाटे, मनोज करपाते, कोकाटे, विजय धारपुरे, किशोर राऊत यांच्या सह मंदिर कमेटीने केले आहे.लोकसहभागातुन होणा-या महाप्रसाद व बांधकाम करण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.यानिमित्ताने भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि भक्तिभाव यांचा अनोखा संगम असलेले भोंडाई मातेचे मंदिर परिसरातील धार्मिक परंपरेचे महत्त्वपुर्ण केंद्र ठरत आहे.

