बेसा परिसरात खळबळ; सायंकाळी घरातुन वादाचा आवाज, त्यानंतर घरात पसरली भयाण शांतता!
शिवशाही न्युज नेटवर्क नागपुर
नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत विवाहबंधनात अडकलेल्या शिक्षक दाम्पत्याचा अवघ्या ७८ दिवसांत दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना नागपुर शहरातील बेसा परिसरात उघडकीस आली. मनीष प्रल्हाद गणवीर(वय ३८) आणि सोनाली मनीष गणवीर (वय ३४) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नागपुर शहरासह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली हे दोघेही शिक्षक म्हणुन कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील एका शाळेत ते नोकरीला होते. नागपूरमधील बेसा परिसरातील रेवतीनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. यापुर्वीच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींनंतर दोघांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विवाह करून नव्या संसाराला सुरुवात केली होती. मात्र, संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातल्याने अवघ्या ७८ दिवसांत त्यांच्या आयुष्याचा प्रवास संपला.
घटनेच्या एक दिवस आधी मनीष यांचे कुटुंबीय बिहारमधील बोधगया येथे गेले होते. त्यामुळे घरी हे दाम्पत्यच होते. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घरातून वादविवादाचा आवाज आल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यानंतर घरात शांतता पसरली. काही वेळाने दोघेही घरात मृतावस्थेत आढळुन आले.
बेलतरोडी पोलिसांकडुन तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत्युचे गुढ कायम!
या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैवाहिक आयुष्यातील तणाव किंवा अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत. उत्तरीय तपासणी अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अवघ्या ७८ दिवसांपुर्वी सुरू झालेला संसार असा अचानक संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दोन जीवांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
