नागपुरात १० वर्षीय चिमुकलीवर जन्मदात्या पित्याकडुन अत्याचार; आईच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपुर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वागण्यात झालेला बदल, वारंवार बिघडणारी प्रकृती आणि शारीरिक त्रास पाहुन आईला संशय आला. अखेर आईने घरात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आणि त्यातील दृश्यांमधुन संतापजनक प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली आपल्या कुटुंबासह नागपुरातील पाचपावली परिसरात भाड्याच्या घरात राहते. तिची आई खासगी रुग्णालयात केअरटेकर म्हणुन काम करते, तर वडील मेकॅनिक आहेत. मागील काही महिन्यांपासुन मुलीच्या प्रकृतीत वारंवार बिघाड होत होता. तिला संसर्गाचा त्रास होत असल्याचेही आईच्या लक्षात आले. त्यामुळे मुलीसोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याची शंका आईला आली.
मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आईने पतीच्या नकळत घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला. फुटेज तपासले असता, मुलीचा जन्मदाता पिता तिच्यावर अत्याचार करत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार मागील काही महिन्यांपासुन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांच्या भीतीमुळे चिमुकलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.
आईच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक
हा प्रकार समोर आल्यानंतर आईने तातडीने पाचपावली पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी पित्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलांच्या वागण्यात अचानक बदल होणे, विनाकारण भीती वाटणे किंवा वारंवार शारीरिक त्रास जाणवणे अशा बाबी पालकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे ही काळाची गरज आहे.
