वडिलांसोबत दुचाकीने जात असताना काळाचा घाला; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यु
शिवशाही न्यूज नेटवर्क | चंद्रपुर
दिवाळीचा आनंद साजरा होत असतानाच चंद्रपुर शहरातुन काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर फोडण्यात आलेल्या फटाक्याच्या स्फोटामुळे उडालेली गिट्टी थेट डोक्याला लागल्याने अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. कृष्णाली ठोंबरे असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाली ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीने आत्याकडे जात होती. दरम्यान, चंद्रपुर शहरातील गजानन मंदिर परिसरात काही मुले रस्त्यावर फटाके फोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन वडिलांनी खबरदारी म्हणुन दुचाकी थांबवली.
मात्र, त्याचवेळी फटाक्याचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे रस्त्यावरील गिट्टी उडून थेट कृष्णालीच्या डोक्याला लागली. यात ती गंभीर जखमी झाली. डोक्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने वडिलांनी तिला तातडीने खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला उपचारापुर्वीच मृत घोषित केले.
क्षणभरात होत्याचे नव्हते झाले.
डोळ्यांसमोर खेळणाऱ्या चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
*फटाके फोडताना काळजी घेण्याची गरज!*
या घटनेने फटाके फोडताना घ्यावयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने केवळ फटाके फोडणाऱ्यांचाच नव्हे, तर रस्त्याने जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
एका निष्पाप चिमुकलीच्या मृत्युने संपुर्ण चंद्रपुर शहर हळहळले आहे.
