कान्हापुर येथे आज ह.भ.प. सत्यपाल महाराजांचा कीर्तन सोहळा; सप्तखंजरीच्या निनादात होणार समाजप्रबोधन
अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अनिष्ट रूढींवर कीर्तनातुन प्रहार; जय भोले सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामस्थांचा पुढाकार
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व गोवर्धन पूजनाचे औचित्य साधुन समाजप्रबोधनाचा जागर घडविण्यासाठी कान्हापुर येथील कान्हा नगरीमध्ये आज, मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सप्तखंजरी वादक तथा प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातुन उपस्थितांना समाजजागृतीचा संदेश देणार आहेत.
जय भोले सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रात्री ८ ते १० या वेळेत पार पडणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचारांतुन समाजाला अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामविकास, स्वच्छता आणि सामाजिक एकतेचा अमुल्य संदेश दिला. हाच विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. सत्यपाल महाराज आपल्या खास सप्तखंजरीच्या शैलीतुन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि विविध सामाजिक समस्यांवर परखड भाष्य करणार आहेत. त्यांच्या प्रभावी कीर्तनातुन नागरिकांमध्ये वैचारिक परिवर्तन आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
समाजप्रबोधनाच्या या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी कान्हापुरसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय भोले सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने राकेश अगडे यांनी केले आहे.
