दिवाळीच्या पर्वावर दुःखाचा डोंगर
घुग्घुस–चंद्रपूर मार्गावर रक्तरंजित दुर्घटना; तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते, ट्रकचालक फरार
शिवशाही न्युज नेटवर्क चंद्रपुर
भरधाव ट्रकच्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. घुग्घुस–चंद्रपुर मार्गावरील सोनगाव परिसरात सपरा पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) हा भीषण अपघात घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दोन तरुणांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोतकेसा येथील जयदीप श्रीराम हलामी आणि तनेश्वर कुमारसाय नाग हे गोपाल बुधराम नेताम याच्यासोबत एकाच दुचाकीवरून चंद्रपुरच्या दिशेने जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, जयदीप हलामी आणि तनेश्वर नाग यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर गोपाल बुधराम नेताम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चंद्रपुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
ट्रकचालक वाहनासह फरार; पोलिसांनी पटविली ओळख
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तपासादरम्यान ट्रकचालकाची ओळख भैरव उमराव प्रजापती (वय ३७, रा. एकडला, ता. खागा, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) अशी पटवीली आहे. तो पडोली परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणुन काम करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडुन या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पाइपलाइनच्या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर!
घुग्घुस–चंद्रपूर मार्गावर खासगी कंपनीकडुन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग, धोक्याचे इशारे आणि वाहतुक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दोन तरुणांचा मृत्यु आणि एकाची गंभीर अवस्था पाहता संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतूक सुरक्षेची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
दोन तरुणांचा अकाली मृत्यु
एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर… आणि रस्ते सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला प्रश्न! अशा दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का?
