मारहाणीत गंभीर जखमी दीपक मुरकुटे यांचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी मृत्यु; अमोल गुजरविरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल
शिवशाही न्युज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी परिसरात शेतीच्या वादातुन घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शेतातील विहिरीवरील मोटारपंप बंद पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. लागवडीने शेती करणाऱ्या अमोल शंकर गुजर याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतमालक दीपक किसनराव मुरकुटे यांचा उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी मृत्यु
झाला. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अमोल गुजर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोटारपंपाच्या दुरुस्तीच्या पैशावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी शहरातील रहिवासी दीपक किसनराव मुरकुटे यांची अल्लीपुर शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतात त्यांनी पानपिंपरी पिकाची लागवड करण्यासाठी अमोल शंकर गुजर याला शेती लागवडीने दिली होती. दरम्यान, शेतातील विहिरीवरील मोटारपंप बंद पडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी कारागिराला बोलावण्यात आले होते. मात्र, दुरुस्तीचे पैसे देण्याच्या कारणावरून दीपक मुरकुटे आणि अमोल गुजर यांच्यात वाद निर्माण झाला.
लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण
सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. यावेळी अमोल गुजर याने दीपक मुरकुटे यांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच तिसऱ्या दिवशी त्यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
मृत्युनंतर प्रकरणाला गंभीर वळण
दीपक मुरकुटे यांच्या मृत्युनंतर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी या प्रकरणी अमोल शंकर गुजर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुरज बोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भास्कर करीत आहेत.
शेतीतील मोटारपंपाच्या दुरुस्तीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद अखेर एका शेतकऱ्याच्या मृत्युला कारणीभुत ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. किरकोळ आर्थिक वादातुन माणसाचा जीव जाण्यापर्यंत परिस्थिती पोहोचल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मयत दिपक मुरकुटे

आरोपी अमोल गुजर
