दिनेश घोडमारे
सिंदी रेल्वे
घातपाताचा संशय?
सिंदी (रेल्वे ): सिंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आमगाव नजिक असलेल्या सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळ रविवारी मध्यरात्री एक थरारक घटना घडली
. गेल्या आठ दिवसांपासुन संशयास्पदरीत्या उभी असलेली, नंबर प्लेट नसलेली एक ‘झायलो’ कार अचानक पेटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी लागली की लावली, याबाबत आता गुढ निर्माण झाले आहे.
*नेमकी घटना काय *
वर्धा मार्गावरील आमगाव नजिकच्या रोपवाटिकेजवळ मागील आठ दिवसांपासुन एक पांढऱ्या रंगाची झायलो कार बेवारस स्थितीत उभी होती. या कारला नंबर प्लेट नसल्याने परिसरात आधीच शंकेचे वातावरण होते. रविवारी (१९ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास या कारने अचानक पेट घेतला. आगीची तिव्रता इतकी भीषण होती की, कार जळुन कोळसा झाली असुन लगतच्या झाडाझुडपांनाही आगीची झळ बसली. घटनेची माहिती मिळताच सिंदी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
पोलीस उपनिरीक्षक ओम कलेगुरुवार, कर्मचारी प्रफुल डफ व रवी मोरे यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला असुन प्राथमिक तपास सुरू केला आहे. विना नंबरची कार आठ दिवसांपासुन तिथे कोणाच्या सांगण्यावरून उभी होती? बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाले की पुरावा नष्ट करण्यासाठी कार पेटवुन देण्यात आली? या कारचा वापर एखाद्या गुन्ह्यात करण्यात आला होता का?, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आमगाव नजिक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असुन, सिंदी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

