सेलु : तालुक्यातील वडगाव जंगली येथील ज्ञानेश्वर देवाजी भुरसे (वय ६७ वर्ष) या शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
ज्ञानेश्वर भुरसे हे शनिवारी १८ एप्रिल रोजी घरुन निघुन गेले. ते अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी नातेवाईकाकडे व इतरत्र शोधाशोध वडगाव (जंगली) येथील घटना
केली. पण, ते न मिळाल्याने सेलु पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली. बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जुनगड येथील राजेंद्र उडाण यांच्या वडगाव (जंगली) शिवारातील शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळुन आला. याची माहिती वडगाव जंगली येथील पोलीस पाटील स्वप्नील सयाम यांनी सेलु पोलीसांना दिली. सेलु पोलीस स्टेशनचे प्रशांत श्रीवास्तव, किरण वरभे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. ज्ञानेश्वर देवाजी भुरसे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्यावर केळझर येथील महाराष्ट्र बँकेचे एक लाख दहा हजार रुपयांचे कर्ज असुन काही खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. एक महिन्यापुर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचा अपघात झाला होता. दोन्ही मुलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. कर्जाचा वाढता डोंगर तसेच नापीकी आणि शेतीमालाला मिळणाऱ्या अल्पदरामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या भुरसे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सेलु पोलिसांनी नोंद केली.

