सेलू :-तालुकास्तरीय क्रीडा शिक्षकांची जनरल सभा यशवंत महाविद्यालय, सेलू येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने स्पर्धांचे नियोजन, आयोजन व विविध क्रीडा विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संदीप काळे होते. त्यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना आगामी क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य संधी देण्यासाठी तसेच स्पर्धा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी क्रीडा संयोजक दिलीप गावंडे उपस्थित होते. तसेच सुरेश चमचोर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा आशा मेश्राम आणि तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका क्रीडा संयोजक, सेलू सागर राऊत आणि क्रीडा प्रविण भोयर यांनी उपस्थित सर्व क्रीडा शिक्षकांचे आभार मानले. आगामी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेला सेलू तालुक्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

