जिल्हास्तरीय निवड चाचणीत दमदार कामगिरी; डेरवण, रत्नागिरी येथे होणार ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा
विशेष प्रतिनिधी
सेलु
वर्धा जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी, सेलुच्या पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. या यशामुळे सेलुच्या क्रीडा क्षेत्रात शौर्य अकॅडमीच्या खेळाडुंच्या कामगिरीची विशेष दखल घेतली जात आहे.
१६ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. सेजल चौधरी हिने ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. भार्गवी मेघे हिने गोळाफेकमध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील मुलांच्या गटात हिमांशु खांदारे याने गोळाफेकमध्ये, तर अन्वय निलसकर याने १००० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळविला. २० वर्षांखालील मुलांच्या गटात हर्षल सुरुसे याने १५०० मीटर धावण्याच्या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
या पाचही खेळाडुंची डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे २७ ते ३० ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडुंसोबत व्यवस्थापक म्हणून यश सोनवणे हे स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल वर्धा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव रमेश बुटे, संघटनेचे पदाधिकारी सुधाकर वाघमारे, शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक अनंत भाकरे, अध्यक्ष हेमंत नाईकवाडे, उपाध्यक्ष फौजन सैय्यद, प्रशिक्षक आसिफ आशिफ पठाण, पुजा कटरे, हेमंत जाधव, करण देऊळकर, मंगल जगताप तसेच अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी निवड झालेल्या खेळाडुंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या यशाचे श्रेय निवड झालेल्या खेळाडुंनी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांना दिले. राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून सेलुचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार या खेळाडुंनी व्यक्त केला आहे.

