वर्धा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १ लाख ४२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा व सेलु तालुक्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी
वर्धा
वर्धा शहर पोलिसांनी अवैधरित्या डिझेलची साठवणुक व वाहतुक करून विक्री करणाऱ्या टोळीविरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे. महिला आश्रम परिसरातील यशवंत महाविद्यालयाजवळ पोलिसांनी संशयित कारची झडती घेतली असता तब्बल ३२० लिटर डिझेल आढळुन आले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून कार, डिझेल, मोबाईल व प्लास्टिकचे डबे असा एकुण १ लाख ४२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा शहर पोलिसांचे पथक परिसरात गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमएच-३१ एएच-८५४९ क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारची तपासणी करण्यात आली. कारच्या मागील सीट व डिक्कीमध्ये प्लास्टिकचे डबे आढळुन आले. प्रत्येक डब्यात सुमारे २० लिटर याप्रमाणे एकुण ३२० लिटर डिझेल पोलिसांच्या हाती लागले.
या प्रकरणी पोलिसांनी आसिफ अमीर शेख (३५, रा. सुरगाव, रेहकी, ता. सेलु, जि. वर्धा) आणि दिलदार खान पठाण (४०, रा. सुरगाव, ता. सेलु, जि. वर्धा) यांना ताब्यात घेतले.
१.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा व सेलु तालुक्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
कारवाईदरम्यान पोलिसांनी मारुती सुझुकी कार – १ लाख रुपये, ३२० लिटर डिझेल – ३१ हजार ६८० रुपये, ओप्पो कंपनीचा मोबाईल – ६ हजार रुपये आणि १६ प्लास्टिक डबे – ४ हजार ८०० रुपये, असा एकूण १ लाख ४२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक तपासात सर्व्हिस टँकरमधुन कमी दरात डिझेल मिळवुन ते अधिक दराने विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या साठवणुक व वाहतुक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध पेट्रोलियम अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८७ व ३(५) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
करवाई दरम्यान दहेगाव येथील नायरा पेट्रोलियम येथुन निघणारे ट्रक धाब्यावर थांबवुन त्यातील डिझेलचा काळाबाजार उघड होऊन सेलु तालुक्यातील व वर्धा येथील अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वर्धा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेश कुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.
अवैध इंधन विक्रीच्या साखळीचा पुढील तपासातुन पर्दाफाश होण्याची शक्यता असुन, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

