राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू : – तालुक्यातील निसर्गरम्य बोरधरण परिसर पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याच्या कामांना शासनाकडुन नव्याने ४ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असुन, या उपक्रमाला आता अधिक वेग येणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या सान्निध्यात असलेल्या या स्थळाचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मांडली असुन, त्यानुसार विविध पायाभुत सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बोरधरण परिसर हा जैवविविधतेने समृद्ध असुन, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागी वसलेला आहे. वाघांसह विविध वन्यजीव आणि पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याठिकाणी बोटींगसह निसर्गसफारी, पर्यटन सुविधा आणि निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या वन व निसर्ग पर्यटन योजनेतुन यापुर्वीच ६ कोटी २३ लाख रुपयांची कामे मंजुर करण्यात आली होती. यात सफारी वाहने, गेट्सची उभारणी, पॉलिकार्बोनेट शेड, तसेच रिसॉर्टच्या सुविधा विकसित करण्याचा समावेश आहे. आता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतुन अतिरिक्त ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने एकूण मंजुर निधी १० कोटी २३ लाखांवर पोहोचला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी रहाटी आणि ढगा ही नवी प्रवेशद्वारे सुरू करण्यात आली असुन, निसर्ग सफारीसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बोटींगसाठी जेटी उभारणी, सोलर लाईटद्वारे विद्युतीकरण आणि परिसराचे सौंदर्याकरण या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे. या विकासकामांमुळे बोरधरण परिसर भविष्यात राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणुन उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीची संधी निर्माण होणार असुन, जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.

