हमीभावाची प्रतीक्षा… चण्याचे पोते गोदामातच अडकले
सेलू (वर्धा) |शहर प्रतिनिधी :
नाफेडच्या चणा खरेदी प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाल्याने ७३९ शेतकऱ्यांचा माल खरेदीअभावी अडकुन पडला आहे. अचानक खरेदी पोर्टल बंद करण्यात आल्याने हमीभावाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सेलु तालुक्यात नाफेडमार्फत चणा खरेदीसाठी ११५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यापैकी केवळ ४२० शेतकऱ्यांचाच माल खरेदी करण्यात आला असुन, उर्वरित शेतकरी अजुनही प्रतीक्षेत आहेत. बाजारात चण्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा पुर्ण भर नाफेडवर होता; पण पोर्टल बंद झाल्याने विक्रीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
दरम्यान, सिंदी येथील शेतकरी खरेदी-विक्री समितीने प्रशासनाला निवेदन देत खरेदी पोर्टल तात्काळ सुरू करावे, २५ ते ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी आणि खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे अशी मागणी केली आहे. तसेच खरेदीसाठी आवश्यक असलेल्या बारदानाचीही तातडीने उपलब्धता करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

