चौकीत ५ मेपासुन वारकरी बाल संस्कार शिबिर; १५ दिवस मुलांचा आध्यात्मिक ‘कॅम्प’
राजेश वरटकर
मुख्य संपादक
हिंगणा (नागपुर) :मोबाईल, गेम्स आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या नव्या पिढीला संस्कार, शिस्त आणि भक्तीमार्गाची ओळख करून देण्यासाठी चौकी येथील श्री क्षेत्र गुरु बृहस्पती मंदिरात ५ मे ते २० मे दरम्यान भव्य वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांमध्ये वाढत चाललेली असंयमितता आणि संस्कारांचा अभाव लक्षात घेता, या शिबिराच्या माध्यमातुन वारकरी परंपरेची गोडी आणि संत विचारांची बीजं लहान वयातच पेरण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.
पखवाज ते गीता — संस्कारांचा ‘फुल पॅकेज
या १५ दिवसांच्या शिबिरात पखवाज, गायन चाली, हरिपाठ, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, संत चरित्र यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पहाटे ५ वाजता योगासन, काकडा ते रात्री संतचरित्र असा शिस्तबद्ध दिनक्रम ठेवुन मुलांच्या सर्वांगीण घडणीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
कीर्तनकारांचा ‘संस्कार वर्ग’
ह.भ.प. शैलेश महाराज गांजरे, गजानन महाराज गिरी, गणेश महाराज तेलरांधे, उमेश महाराज बाबुळकर, खुशाल महाराज वैद्य, सुनील महाराज अवचट यांच्यासह स्नेहाताई दुधबडे, श्वेताताई क्षिरसागर आदी अनुभवी गुरुजनांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मोबाईलला ‘नो एंट्री’; शिस्तीला ‘फुल ग्रीन सिग्नल’!
शिबिरादरम्यान मोबाईलवर पुर्ण बंदी ठेवण्यात आली असुन, मुलांना साधेपणा, अनुशासन आणि भक्तीमय जीवनशैलीची सवय लावण्यावर भर दिला जाणार आहे.
६ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिबिर खुले असुन प्रवेश शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे.
सांगता ‘काल्याच्या कीर्तनाने’ रंगणार
२० मे रोजी ह.भ.प. स्नेहाताई दुधबडे (आळंदीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होणार असुन, महाप्रसादासाठी पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क : 9022612419 / 7066978002
👉 आयोजक : समस्त गुरु बृहस्पती संस्थान कमेटी, चौकी

