हातात पुस्तकाऐवजी मोबाईल… मैदानाऐवजी रील्स… आणि संवादाऐवजी फक्त ‘ऑनलाईन’ जगणं
राजेश वरटकर
मुख्य संपादक
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात खेळणी नाहीत, तर थेट मोबाईल दिसत आहे. सकाळपासुन रात्रीपर्यंत मोबाईल, गेम्स, इंस्टाग्राम रील्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली नवी पिढी आता वास्तवापासुन दुर जात असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
पालक कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ कमी पडतो. परिणामी अनेक घरांमध्ये मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल हा ‘सोप्पा उपाय’ बनला आहे. मात्र हाच उपाय भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ देत आहेत.
अनेक मुलं आता मैदानी खेळ, वाचन, मित्रांसोबत संवाद यापासुन दुर जात आहेत. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे चिडचिड, एकटेपणा, नैराश्य, झोपेच्या समस्या आणि अभ्यासातील अनास्था वाढत असल्याचेही समोर आले आहे.
विशेष म्हणजे काही पालक स्वतः दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने मुलांवर त्याचाच प्रभाव पडत आहे. “मुलं जे पाहतात, तेच शिकतात,” असे तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रामीण भागातही आता मोबाईलचे व्यसन झपाट्याने वाढत असून अनेक शाळकरी मुलं ऑनलाईन गेम्स आणि सोशल मीडियात अडकत चालली आहेत. अभ्यास, संस्कार आणि कुटुंबातील संवाद यांची जागा आता स्क्रीनने घेतल्याचे वास्तव चिंताजनक मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुलांना वेळ देणे, त्यांच्यासोबत संवाद वाढवणे, मैदानी खेळ आणि वाचनाची सवय लावणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेलं हे बालपण पुढील काळात समाजासाठी मोठं संकट ठरू शकतं.

