दोन वर्षांत दर दुपटीने वाढले; स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
राजेश वरटकर
मुख्य संपादक
राज्यात महागाईचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना आता लाल मिरचीने सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. दोन वर्षांपुर्वी बाजारात शंभर ते सव्वाशे रुपये किलो मिळणारी लाल मिरची आता तब्बल अडीचशे रुपये किलोवर पोहोचली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचे गणित पुर्णपणे बिघडले असुन “लाडकी बहीण” योजनेतुन मिळणारी मदतही महागाईसमोर अपुरी पडत असल्याची भावना महिलांमध्ये व्यक्त होत आहे.
बाजारात लाल मिरचीच्या वाढत्या दरामुळे किरकोळ व्यापारी आणि ग्राहक दोघेही हैराण झाले आहेत. उत्पादन घट, वाहतुक खर्चात वाढ आणि साठेबाजांचा प्रभाव यामुळे दर गगनाला भिडल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात तर अनेक कुटुंबांनी मिरचीचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे.
गृहिणींच्या मते, आधीच डाळी, तेल, भाज्या आणि गॅस सिलिंडरच्या दरांनी कंबरडे मोडले आहे. त्यात आता लाल मिरचीसारख्या रोजच्या वापराच्या वस्तुही आवाक्याबाहेर गेल्याने स्वयंपाकघर सांभाळणे कठीण झाले आहे. “महागाई कमी करण्याचे आश्वासन देणारे सरकार नेमके कुठे आहे?” असा सवालही नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीची आवक कमी असल्याने आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातील तिखटपणा आता थेट खिशाला झळ पोहोचवत असल्याचे चित्र आहे.

