१५दिवसांपासुन नळ कोरडे; ग्रामस्थांचा संताप”
पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सेलु तालुक्यातील घोराड येथील वार्ड नंबर तिन मधील ग्रामस्थांनी तीव्र पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार देत संताप व्यक्त केला आहे. मागील १५ ते २० दिवसांपासुन नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत असून महिलांना पाण्यासाठी पहाटे ३ वाजता पासुन पिण्याच्या पाण्याची वाट बघावी लागत असुन पुरेसे पाणी मिळत नसल्याने भटकंती करावी लागत आहे.सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात करोडो रुपयांची पाणी पुरवठा योजना अंमलात आणली असुन २४/७ योजनेनुसार नागरिकांना पाणी पुरवठा करणे गरजेचे असताना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महीलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.कर भरण्यासाठी तगादा लावला जात असताना पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरत असलेले कर्मचारी मात्र उद्धटपणे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावातील अनेक भागांमध्ये नळयोजनेचे पाणी पोहोचत नसुन नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांसह महिला भगिनींनी केला आहे.
“गावातील वार्ड नंबर तिन मधील नामदेव महाराज समाधी स्थळाचा मागील बाजूस असलेल्या गोटात परिसरात अजिबात पाणी येत नाही. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत, तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे गावकऱ्यांचे हाल होत असुन प्रशासनाने तातडीने सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

