घोराड प्रतिनिधी : खरीप हंगाम तोंडावर असताना घोराड गावासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या कृषी सेवक सुमारे दीड महिन्यांपासुन रजेवर असल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची, बियाण्यांची तसेच खत व्यवस्थापनाची आवश्यक माहिती वेळेवर मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
गावातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कृषी सेवक मे महिन्यापासुन रजेवर असुन खरीप हंगामापुर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असताना कृषी विभागाकडुन आवश्यक माहिती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या सुचना व माहिती ग्रामपंचायत नोटीस बोर्डावरही लावल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या कार्यक्रमांची माहिती गावातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसुन काही मोजक्याच व्यक्तींना माहिती दिली जात असल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नव्याने नियुक्त झालेल्या कृषी सेवकांना इतक्या प्रदीर्घ कालावधीची रजा कशी मंजुर करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना बियाणे निवड, खत व्यवस्थापन व पीक नियोजनाबाबत तातडीने मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घोराड येथील शेतकरी बांधवांनी केली आहे. कृषी विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत कृषी सहायक वैशाली लोंढे यांना अवगत केले असता त्यांनी सांगितले की माझे लग्न असल्याने मला २० दिवसांची रजा मिळाली होती मात्र लग्न कार्य साठी दिवस अपुरे पडत असल्याने मी सुट्टी वाढवुन घेतली, तसाही माझा प्रोबेशन पिरीयड वाढला आहे तर त्या रजा त्यामध्ये येऊन जाईल,आणी मी कालच गांव बैठक घेतली याची माहिती घोराड गृप वर दिली मात्र एकही शेतकरी आला नाही म्हणून मी काही शेतकऱ्यांना फोन करून बोलावून घेतले, तसेच शेतीशाळा ही महीला शेतकरी वर्गासाठी असल्याने मी ईतर शेतकऱ्यांना बोलावले नाही, माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहे.
वैशाली लोंढे
कृषी सहायक,घोराड

