अधिक मास निमित्त विशेष लेख
राजेश वरटकर
सध्या सुरू असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. १५ मे ते १५ जुन या कालावधीत असलेल्या या विशेष महिन्यात जावयांचा यथाशक्ती सन्मान करण्याची परंपरा असल्याने अनेक सासरवाड्यांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जावयांना विशेष निमंत्रणे, भोजनावळी आणि पारंपरिक वाण देण्याच्या कार्यक्रमांमुळे विवाहित पुरुषांसाठी हा महिना खास ठरत आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात धोंड्याच्या महिन्याची रंगत वाढली असुन सोशल मीडियावरही यासंदर्भातील विनोदी पोस्ट आणि संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. “अधिकमास सुरू झाला, आता धोंडा बांधुन फिरावे लागेल” अशा मिश्किल पोस्ट्समुळे या परंपरेची चर्चा अधिक रंगतदार बनली आहे.
लोकपरंपरेत अधिकमासाला धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास अशा विविध नावांनी ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णु हे या महिन्याचे अधिपती मानले जातात. त्यामुळे या काळात जप, तप, दानधर्म, उपवास, नामस्मरण आणि विविध धार्मिक विधींना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भाविक या महिन्यात सत्संग, पारायण आणि सामाजिक सेवाकार्यातही सहभागी होतात.
अधिकमासामागे धार्मिक श्रद्धेसोबतच महत्त्वपुर्ण खगोलशास्त्रीय आधारही आहे. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांच्यात दरवर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक साधारण ३३ महिन्यांनंतर एका पुर्ण महिन्याएवढा होतो. ऋतु, सण आणि कालगणनेतील समतोल राखण्यासाठी पंचांगात अधिकमासाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कालगणनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनही अधोरेखित होतो.
ग्रामीण भागात या महिन्यात जावयांना ३३ अनारसे, ३३ धोंडे किंवा इतर पारंपरिक पदार्थांचे वाण देण्याची प्रथा आजही जपली जात आहे. या निमित्ताने दोन कुटुंबांतील नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि कौटुंबिक जिव्हाळा वाढतो.
धकाधकीच्या आधुनिक जीवनशैलीत अधिकमास आत्मपरीक्षण, संयम आणि मनःशांतीचा संदेश देतो. काही क्षण स्वतःसाठी काढून अंतर्मुख होण्याची प्रेरणा देणारा हा महिना श्रद्धा, विज्ञान आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणुन ओळखला जातो. त्यामुळेच धोंड्याचा महिना आजही समाजजीवनात विशेष महत्त्व राखुन आहे.

