शिवशाही न्युज नेटवर्क
गोव्यात नैऋत्य मान्सुनचे अधिकृत आगमन झाले असुन पुढील काही दिवसांत तो कोकण किनारपट्टीत दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार महाराष्ट्रातील दक्षिण कोकण-गोवा भागात पावसाची तीव्रता वाढणार असुन मान्सुनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकुल आहे.
येत्या ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४०ते ५०किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी वीज पडण्याच्या घटनांपासुन सावध राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
IMD च्या प्रादेशिक अहवालानुसार ६ ते ८ जुनदरम्यान दक्षिण कोकण-गोवा भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी हवामान राहु शकते. विदर्भातील काही जिल्ह्यांतही ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सुन आता वेगाने पुढे सरकत असुन गोव्यानंतर महाराष्ट्राच्या किनारी भागात त्याचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील उष्णतेपासुन काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

