विशेष प्रतिनिधी
हिंगणघाट
हिंगणघाट शहरात विदेशी जातीचे श्वान पाळणाऱ्या नागरिकांकडुन नगरपालिका प्रशासनाने वार्षिक कर आकारावा आणि त्या निधीचा उपयोग देशी श्वानांचे संगोपन, लसीकरण, निवारा व संरक्षणासाठी करावा, अशी मागणी निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुप यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात विदेशी श्वान पाळण्याची फॅशन वाढत असून त्यामुळे भारतीय देशी श्वानांकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय हवामान व पर्यावरणाशी जुळवुन घेतलेल्या देशी श्वानांचे संवर्धन होणे आवश्यक असताना त्यांना दत्तक घेण्याचे प्रमाण सातत्याने घटत आहे. अनेक नागरिक प्रजनन केंद्रांतुन विदेशी जातींचे श्वान आणून पाळत असल्याने शहरातील श्वानसंख्या वाढत असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
शहरात मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिका नसबंदी मोहीम राबवत असली तरी दुसरीकडे काही कुटुंबांमध्ये पाच ते सहा विदेशी श्वान पाळले जात असल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे देशी श्वानांच्या संवर्धनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता निसर्गसाथी ग्रुपने व्यक्त केली आहे.
पालिकेचा मुख्य उद्देश मोकाट व देशी श्वानांचे संरक्षण, त्यांचे आरोग्य संवर्धन आणि निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे हा असावा, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तसेच शहरात काही नागरिकांकडे ‘पिटबुल’सारख्या आक्रमक व धोकादायक जातीचे श्वान पाळले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.

