खंडणीसाठी बिटकॉईनची मागणी; रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल
अजय कुमार गांजरे
तालुका प्रतिनिधी वरोरा
चंद्रपुर शहरातील कॅन्सर उपचारासाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय आणि प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा एन्क्रिप्ट करून लॉक केला असून तो परत मिळवुन देण्यासाठी बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रॅन्समवेअर हल्ल्यात शेकडो रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, उपचारांची नोंद, तपासणी अहवाल तसेच रुग्णालयाच्या प्रशासकीय नोंदींना फटका बसला आहे. त्यामुळे डॉक्टरांना जुन्या केस फाईल्स आणि उपचारविषयक माहिती मिळविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी काही सेवा तात्पुरत्या प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायबर गुन्हेगारांनी डेटा परत मिळवुन देण्यासाठी सुमारे १.२३४५६ बिटकॉईन खंडणीची मागणी केली असुन, पैसे न दिल्यास संपुर्ण डेटा कायमचा नष्ट करण्याची धमकी दिली आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
या प्रकरणी चंद्रपुरच्या रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन सायबर सेलचे विशेष पथक तांत्रिक तपास करीत आहे. हल्ल्यामागील सुत्रधारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील प्रमुख रुग्णालयांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णांचा संवेदनशील वैद्यकीय डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
रुग्णांच्या उपचारांवर परिणाम
वैद्यकीय इतिहास आणि उपचार नोंदी लॉक
जुन्या केस फाईल्स उपलब्ध होण्यात अडचणी
प्रशासकीय कामकाजावर परिणाम
डेटा परत मिळवण्यासाठी बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी
सायबर पोलिसांकडुन तपास सुरू.

