पटसंख्या वाढविण्याच्या शर्यतीत ज्ञानाचा गळा घोटला जातोय का?
राजेश वरटकर
मुख्य संपादक
एकेकाळी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धडपड असायची. आज मात्र विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांना दारोदार फिरावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रातील ही शोकांतिका नसुन आणखी काय? राज्यभरात अनेक शाळांमध्ये पटसंख्या घटत असुन, शिक्षणाचा आत्माच हरवत चालल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शिक्षकांच्या खांद्यावर ज्ञानदानाची जबाबदारी असताना त्यांना आता प्रवेश मोहिमा, पटसंख्या वाढविणे आणि कागदोपत्री आकडे जुळविण्याच्या कामात गुंतवले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना शिक्षण क्षेत्रातुन व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर आहे. काही ठिकाणी शाळा आहेत पण विद्यार्थी नाहीत, तर काही ठिकाणी विद्यार्थी असुनही शिक्षकांची कमतरता आहे. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या आकर्षणामुळे आणि खासगी शाळांच्या स्पर्धेमुळे जिल्हा परिषद व सरकारी शाळांना अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.
दरम्यान, शिक्षणाचे मुल्यमापन केवळ पटसंख्येवर होत असल्याने ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे मुलभुत घटक मागे पडले आहेत. शाळा टिकविण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड होत असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञांकडुन केला जात आहे.
शिक्षण हा केवळ नोकरी मिळविण्याचा मार्ग नसुन समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. मात्र आजच्या व्यवस्थेत ज्ञानापेक्षा आकडेवारीला आणि गुणवत्तेपेक्षा पटसंख्येला महत्त्व दिले जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
विद्यार्थ्यांच्या शोधात फिरणारे गुरुजी आणि ओस पडणाऱ्या वर्गखोल्या हा केवळ शिक्षण विभागाचा नव्हे, तर समाजाच्या भविष्याचा गंभीर इशारा आहे. आता तरी शिक्षण व्यवस्थेने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे; अन्यथा पुढील पिढीच्या हातातुन खरे ज्ञान कायमचे निसटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

