जिल्ह्यातील १६ हजार २३३ बालकांना पाजली जाणार जीवनरक्षक पोलिओ लस; प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
पोलिओसारख्या गंभीर आजारापासुन बालकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात २८ जुन रोजी व्यापक पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल १६ हजार २३३ बालकांना पोलिओची तोंडी लस देण्यात येणार असुन आरोग्य विभागाने यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महिला व बालविकास विभाग तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या प्रतिनिधींनी मोहिमेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा केली.
जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासुन वंचित राहु नये यासाठी ग्रामीण व शहरी भागात विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ८ हजार ९३० तर शहरी भागातील ७ हजार ३०३ बालकांना लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ४८४ लसीकरण बुथ, ३३ मोबाइल पथके आणि ८२ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत.
बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकापर्यंत पोलिओची मात्रा पोहोचविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध विभागांचे कर्मचारी सज्ज झाले आहेत.
पोलिओमुळे आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे देश पोलिओमुक्त घोषित झाला असला तरी हा दर्जा कायम राखण्यासाठी नियमितपणे अशा मोहिमा राबविणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
२८ जुन रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर मोफत पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील मुलांना आवर्जुन पोलिओची मात्रा पाजावी आणि मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
“दोन थेंब जीवनाचे” देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असुन प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवुन पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.

