महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीनंतर परिवहनमंत्र्यांचा निर्णय; ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांना दिलासा
शिवशाही न्युज नेटवर्क
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला अखेर ब्रेक लागला आहे. प्रवाशांच्या वाढत्या नाराजीची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एनसीएमसी कार्डची सक्ती मागे घेत ती ऐच्छिक केली आहे. त्यामुळे आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारक प्रवाशांना पुर्वीप्रमाणेच आधार कार्ड अथवा अन्य वैध ओळखपत्र दाखवुन सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
एसटी महामंडळाने काही महिन्यांपुर्वी सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्ड काढण्यासाठी लांबच लांब रांगा, वेळेवर रिचार्ज करण्याची कटकट आणि तांत्रिक अडथळे यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
सवलतीसाठी पुर्वी आधार कार्ड पुरेसे असताना नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. “सवलतीचा प्रवास सोपा करण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा का केला जात आहे?” असा सवाल सर्वसामान्य प्रवाशांकडुन उपस्थित केला जात होता.
दरम्यान, वाढत्या विरोधानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला. आता एनसीएमसी कार्ड असणे बंधनकारक राहणार नसुन इच्छुक प्रवासी ते वापरू शकतील. मात्र, सवलतीसाठी आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्रही ग्राह्य धरले जाणार आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असुन, एसटी प्रवास पुन्हा एकदा सुलभ आणि सोयीचा होणार असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

