अजय कुमार गांजरे
तालुका प्रतिनिधी
वरोरा
नेपाळची राजधानी काठमांडु येथे ४ जुन रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वरोरा येथील अंगद पियुष गजानन जवादे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके पटकावली. या यशामुळे त्याने वरोरा परिसरासह संपुर्ण जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
वरोरा येथील सरदार पटेल वॉर्डातील रहिवासी असलेला आणि इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेणारा अंगदने कुमिते प्रकारात सुवर्णपदक, वैयक्तिक काता प्रकारात रौप्यपदक आणि सांघिक काता प्रकारात कांस्यपदक मिळवुन पदकांची हॅट्ट्रिक साधली.अत्यंत प्रतिकुल व आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीतुन पुढे येत अंगदने कठोर मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर हे यश मिळविले. एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके जिंकुन त्याने आपल्या कुटुंबाचा तसेच शहराचा गौरव वाढविला आहे.
या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अंगदचे अभिनंदन करून त्याच्या पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

