शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे पूर्ण केली असुन आता त्यांची नजर आकाशाकडे लागली आहे. जुन महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिन्यात तीव्र उष्णतेचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतांची मशागत केली. पेरणीयोग्य पाऊस पडेल, या आशेवर त्यांनी बी-बियाणे, खते व इतर कृषी साहित्याची खरेदी केली. मात्र पावसाने दडी मारल्याने पेरणी लांबणीवर पडली असुन उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बियाणे, खते, औषधे, ट्रॅक्टर भाडे तसेच मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. उत्पन्न वाढत नसताना खर्च वाढत असल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला आहे.
शेतकरी सांगतात की, गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक संकटांमुळे मोठे नुकसान झाले. अनेकांना आपल्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असुन शासनाने हमीभावासह शेतमाल खरेदीची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काही भागांत लागवडीची तयारी पुर्ण झाली असली तरी पावसाअभावी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजाची नजर आता केवळ आकाशाकडे लागुन राहिली आहे.

