कारवाईच्या चर्चेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
शिवशाही न्युज नेटवर्क
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच घाटंजी शहरातील अनेक पानटपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेते आणि लहान व्यावसायिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासुन गजबजलेल्या अनेक पानटपऱ्यांवर अचानक शटरबंदी दिसुन आली. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते, पानटपरी चालक आणि फास्टफुड व्यवसायिकांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन, परवाने, स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणीबाबत प्रशासनाकडुन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणुन दुकाने काही काळ बंद ठेवणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्येही या घडामोडींची मोठी चर्चा रंगली आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने कठोर भुमिका घेतल्यास ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
तथापि, संबंधित विभागाकडुन अधिकृत कारवाईबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी शहरातील व्यापारी वर्गात निर्माण झालेली धास्ती आणि अचानक झालेली शटरबंदी हा चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाची भुमिका आणि प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

