शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु/वर्धा
सेलु तालुक्यातील केळझर गावात सुरू असलेल्या अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात येत असलेल्या या कामात तांत्रिक निकषांचे उल्लंघन झाल्याचा दावा नागरिकांनी केला असुन, संबंधित कंत्राटदार आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यापुर्वी जुन्या डांबरी रस्त्याचा थर पुर्णपणे काढुन आवश्यक प्रक्रिया करणे अपेक्षित असते. मात्र, केळझर येथे जुन्या डांबरी रस्त्यावरच थेट सिमेंटचा थर टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या टिकाऊपणा आणि गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी असा आरोपही केला आहे की, हा रस्ता रहदारीचा असुन भविष्यात अवजड वाहनांची वाहतुक होण्याची शक्यता आहे. तरी ही रस्त्याची जाडी केवळ सहा इंच ठेवण्यात आल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काम सुरू असताना ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष या त्रुटींकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सुचना व आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे भविष्यात रस्त्याला तडे जाणे, काँक्रीटचा थर उखडणे आणि सार्वजनिक निधी वाया जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. केवळ काम पुर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी घाईघाईने काम करण्यात येत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या प्रकरणी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असुन, संपुर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक पैशांची उधळपट्टी सहन केली जाणार नसल्याचे सांगत, दोषींवर कठोर कारवाई करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच, योग्य कारवाई न झाल्यास ग्रामसभा, निवेदन मोहीम आणि आंदोलनाच्या माध्यमातुन तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. रस्त्याच्या कामातील सत्य जनतेसमोर आणुन जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केळझरवासीयांकडुन होत आहे.

