शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे सेलू (जि. वर्धा) येथील कु. आरती प्रशांत सोनटक्के हिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. पुनम प्रॉडक्शन आयोजित राज्यस्तरीय ‘मिस ग्लॅम महाराष्ट्र – सीझन ६’ या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत आरतीने उल्लेखनीय कामगिरी करत ‘ग्लॅम महाराष्ट्र सन्मान’ प्राप्त केला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण सेलु तालुका आणि वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्रातील युवतींना आपले व्यक्तिमत्त्व, कला आणि आत्मविश्वास सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी पुनम प्रॉडक्शनची ही स्पर्धा राज्यभरात विशेष लोकप्रिय आहे. यंदाच्या सहाव्या पर्वात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अनेक कठीण फेऱ्या पार करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये नागपुर येथील ‘७ वचन हॉल’ येथे रंगलेल्या अंतिम सोहळ्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
रॅम्प वॉक, व्यक्तिमत्त्व विकास, बौद्धिक क्षमता चाचणी आणि प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यांमध्ये आरतीने आपल्या आत्मविश्वासपुर्ण सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिला ‘ग्लॅम महाराष्ट्र सन्मान’ प्रदान करण्यात आला.
संघर्षातुन यशाकडे प्रवास
आरतीचा हा यशस्वी प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गरीब आणि प्रतिकुल कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत तिने हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी संधी मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात राज्यस्तरावर आपली छाप पाडु हो शकतात, याचे ज्वलंत उदाहरण आरतीने घालुन दिले आहे.
विशेष म्हणजे, आरती यापुर्वी ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ मध्ये फर्स्ट रनर-अप ठरली होती. तसेच पुनम प्रॉडक्शन निर्मित ‘डिझायनर ड्रीम’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिने मुख्य भुमिका साकारून अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशानंतर सेलु शहरासह संपुज्ञर्ण वर्धा जिल्ह्यातुन आरतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन, तिची कामगिरी अनेक ग्रामीण आणि गरजु मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात आणखी मोठ्या मंचावर यश संपादन करण्याचा निर्धार आरतीने व्यक्त केला आहे.

