“आरोप खरे असतील तर कोणतेही पद सोडायला तयार”; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी
मुंबई
शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादावरून राज्यातील राजकारण तापले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर कडाडुन टीका केली. “सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या हाती देणार नाही,” असा घणाघाती इशारा देत त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि निष्ठेतुन उभी राहिलेली संघटना आहे. सत्ता आणि स्वार्थासाठी पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शेवटपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वतःवरील आरोपांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भुमिका मांडली. “माझ्यावरील आरोप सत्य असतील तर कोणतेही पद सोडण्यास मी तयार आहे. मात्र आरोप करणाऱ्यांनीही जनतेसमोर सत्य मांडावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी लोकशाही संस्थांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असुन जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेची भुमिका अधिक आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसैनिकांमध्येही या वक्तव्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

