शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
समुद्रपुर पोलिसांनी खत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असुन चोरीस गेलेले रासायनिक खत, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकुण ६ लाख १६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.
समुद्रपुर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खत चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. फिर्यादी गजानन रामकृष्ण ढोकपांडे (वय ४४, रा. शेडगाव, ता. समुद्रपुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जुन ते १७ जुन २०२६ दरम्यान दहेगाव शेतशिवारातील शेतातुन अज्ञात चोरट्यांनी रासायनिक खताच्या ७८ बॅगा चोरून नेल्या होत्या.
चोरीस गेलेल्या खताची किंमत सुमारे १६ हजार ४६० रुपये होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समुद्रपुर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान स्वप्नील अंकुश महाजन (वय २७, ता. समुद्रपूर), अनिल मारोती मांडवकर (वय ३६, रा. दहेगाव) आणि पुंडलिक विठ्ठल उरकांदे (वय ४०, रा. दहेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडुन चोरीस गेलेले ७८ पोती रासायनिक खत, गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर (किंमत ५ लाख रुपये) आणि ट्रॉली (किंमत १ लाख रुपये) जप्त करण्यात आली. एकूण ६ लाख १६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रपुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार वीरेंद्र मस्के, प्रकाश मेंढे, कपिल मेश्राम, संजय वानखेडे तसेच रामु पंधरे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.
खत चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावुन आरोपींना जेरबंद करण्यात आले असुन पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

