एजंटांच्या भुलथापांना बळी पडु नका; ग्राहकांची फसवणुक होण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी
वर्धा
पर्यावरणपुरक आणि वीजबचतीचा पर्याय म्हणुन सोलर पॅनलची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना काही एजंटांच्या माध्यमातुन ग्राहकांची दिशाभुल होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे सोलर पॅनल बसविण्यापुर्वी संबंधित कंपनी, अधिकृत विक्रेता आणि आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी अधिकृत कंपनी किंवा विक्रेत्याच्या नावाने एजंट ग्राहकांशी संपर्क साधुन काम मिळवतात. सुरुवातीला विविध आश्वासने देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो. मात्र नंतर तांत्रिक बिघाड, देखभाल किंवा सेवा सुविधांच्या बाबतीत अडचणी निर्माण झाल्यास ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोलर पॅनल बसवण्यापुर्वी संबंधित विक्रेत्याचा परवाना, नोंदणी, कार्यालयाचा पत्ता, हमी-अटी आणि सेवा केंद्राची माहिती तपासणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही एजंटवर अवलंबुन न राहता कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींशी थेट संपर्क साधल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात.
दरम्यान, सावंगी मेघे परिसरातील एका कुटुंबाला अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सुचना
• अधिकृत विक्रेत्याची ओळख व परवाना तपासा.
• सर्व व्यवहारांची लेखी नोंद ठेवा.
• हमीपत्र व बिल अवश्य घ्या.
• कंपनीच्या सेवा सुविधांची माहिती जाणुन घ्या.
• एजंटांच्या तोंडी आश्वासनांवर विसंबुन राहु नका.
“सोलर पॅनल बसवण्यापुर्वी पडताळणी करा; अन्यथा आर्थिक फटका बसु शकतो,” असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

