रीडिंग न घेता ‘मीटर फॉल्टी’ची नोंद, हजारो रुपयांची बिले; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विशेष प्रतिनिधी
सेलु
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेनंतर अवाजवी वीजबिले, कार्यालयीन हेलपाटे आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत ग्राहकांनी महावितरणच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ग्राहकांचे मासिक बिल अचानक अनेक पटींनी वाढल्याने संतापाची लाट उसळली असुन, स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, पुर्वी दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत येणारे वीजबिल आता थेट १० ते १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचत आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता ‘मीटर फॉल्टी’, ‘मीटर बंद’ किंवा ‘सरासरी बिल’ अशी नोंद करून ग्राहकांना अवाजवी बिले दिली जात असल्याचा आरोप आहे. चुकीचे बिल दुरुस्त करण्यासाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असुन, ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणावरही सक्तीने लादले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्षात ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.ज्यांनी स्मार्ट मिटर बाबत शंका उपस्थित केली, तसेच नवीन मिटर लावण्यास मनाई केली त्यांच्या विज बिलात वाढ झालेली दिसुन येत आहे हा केवळ योगायोग आहे की विज वितरण कंपनी मुद्दाम तसे करीत आहे?असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाच्या भुमिकेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची, मिटर रीडिंगमध्ये पारदर्शकता आणण्याची आणि अवाजवी वीजबिले तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. स्मार्ट मिटरच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक पिळवणुक होत असल्याचा आरोप अधिक तिव्र होत असुन, हा प्रश्न आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
