५०.८ मिमी सरासरी पावसाची नोंद; खरीप पिकांना दिलासा, मात्र अनेक ठिकाणी नुकसान
राजेश वरटकर
मुख्य संपादक
जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी ५०.८ मिमी पावसाची नोंद झाली असुन तब्बल १८ महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांनी पेरणी व इतर शेतीकामांना वेग दिला आहे.
मात्र या पावसामुळे काही भागांत नाले-ओढ्यांना पुर आला, सखल भागात पाणी साचले आणि वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी घरांचे, शेतीचे व पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा सुरू केला असुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आष्टी (शहीद) तालुक्यातील देवगाव शिवारात विज पडुन १२ जनावरांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असुन संबंधितांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असुन नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
