“नियम तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?”
गोरस भंडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाची कठोर टिप्पणी;
आज होणार पुढील सुनावणी
जिल्हा प्रतिनिधी
वर्धा
वर्ध्यातील गोरस भंडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने अन्न व औषध प्रशासन (एफडीए)च्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेला पुर्वसुचना किंवा नोटीस न देता कारवाई करण्यात आली, मग नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये? असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.
एफडीएने ३१ मे रोजी गोरस भंडारावर छापा टाकुन दुध, तुप, ताक आदी नमुने जप्त केले होते. तसेच सुमारे २५.८६ लाख रुपयांचा दुधसाठा विक्रीस बंदी घालण्यात आली होती. या कारवाईविरोधात संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न करता कोणतीही कठोर कारवाई करता येत नाही. जर अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्यांच्याविरुद्धही कारवाई झाली पाहिजे.
न्यायालयाने एफडीएला यापुर्वी गोरस भंडाराची किती वेळा तपासणी करण्यात आली, त्याचे संपुर्ण अभिलेख सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी ७ जुलै रोजी होणार असुन, एफडीए कडुन सविस्तर उत्तर अपेक्षित आहे.
८०० दुध उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता
एफडीएच्या कारवाईमुळे वर्धा जिल्ह्यातील सुमारे ८०० दुध उत्पादक व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उच्च न्यायालयाच्या कठोर निरीक्षणानंतर आता या शेतकरी आणि संस्थेला दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
“सत्य त्रासले जाऊ शकते; पराभुत होणार नाही.”
गोरस भंडार ही केवळ संस्था नसुन हजारो दुध उत्पादक व त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. अंतिम निर्णय न्याय, सत्य आणि कायद्याच्या चौकटीतच होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
