*दोन पायदळ दिंड्यांचे प्रस्थान; उद्या तिसरी दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार
रुपेश महाकाळकर
प्रतिनिधी/घोराड
विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या श्रीक्षेत्र घोराड येथुन आषाढी वारीनिमित्त पंढरपुरकडे जाणाऱ्या पायदळ दिंड्यांचे उत्साहात प्रस्थान झाले आहे. आतापर्यंत दोन पायदळ दिंड्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या असुन, उद्या (दि. १२) तिसरी दिंडीही भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि विठ्ठलभक्तीच्या ओढीने हजारो वारकरी पायी वारीचा संकल्प पुर्ण करण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत. दिंडी प्रस्थानापुर्वी श्री संत केजाजी महाराज समाधीची महापुजा, आरती आणि पालखी पुजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दिंडीला निरोप दिला.
श्रीक्षेत्र घोराड हे विदर्भातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. येथुन दरवर्षी निघणाऱ्या पायदळ दिंड्यांना मोठी परंपरा लाभली असुन, या वारीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध भागांतील वारकरी सहभागी होत आहेत.
उद्या निघणाऱ्या तिसऱ्या दिंडीच्या स्वागत व निरोपासाठीही भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन, पंढरीच्या दिशेने निघालेल्या या दिंड्या “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे.
घोराडची वारी परंपरा कायम
विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र घोराड येथुन दरवर्षी आषाढी वारीसाठी पायदळ दिंड्या पंढरपुरकडे प्रस्थान करतात. शिस्तबद्ध नियोजन, अखंड हरिनाम आणि वारकरी संस्कृतीचे जतन ही या दिंड्यांची वैशिष्ट्ये असुन, दरवर्षी भाविकांचा सहभाग वाढत आहे.
