सेलु पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा संताप
भारतीय लष्करातील जवानाची पत्नी; सासरच्या मंडळींविरोधात तक्रार, निष्पक्ष तपासाची मागणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. अवघ्या दोन महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या नवविवाहीत तरुणीच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सिंदी (रेल्वे) पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलु येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक तरुणीचे पती भारतीय लष्करात कार्यरत असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक सेलु पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चौकशीसाठी संबंधित सासरच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बसवुन ठेवण्यात आले. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत माहिती घेण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलीस ठाण्यातुन सविस्तर माहिती देण्यात आली नाही. ठाणेदार पंकज वाघोडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी, “मी सध्या रजेवर आहे,” असे सांगितले.
या प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांना विचारणा केली असता रात्री ११वाजेपर्यंत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.आत्महत्येमागील कारणांचा तसेच नातेवाईकांनी तक्रारीत केलेल्या आरोपांचा तपास सुरू असुन, तपास पुर्ण झाल्यानंतरच मृत्युमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नातेवाईकांनी निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
